सिल्लोडचे आ.अब्दुल सत्तार यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा काँग्रेस पक्षाचे अशोक चव्हाण यांनी केली आहे. शनिवारी जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये विलास औताडे यांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाण यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे सत्तारांवर ही कारवाई करण्यात येत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
जोपर्यंत अब्दुल सत्तार पक्षात होते तोपर्यंत त्यांचा मान राखला. मात्र तुम्हाला उमेदवारी देताना विश्वासात घेऊनही तुम्ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जर आमूक व्यक्तीला उमेदवारी द्या अशी भूमिका जर असाल तर ते पक्षाला मान्य नाही. त्यामुळे पक्षाविरोधात भानगडी करत असलेल्या अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याची घोषणा अशोक चव्हाण यांनी केली. त्यामुळे आता विषय संपलेला असून आम्ही जो अधिकृत उमेदवार दिला आहे. त्याच्या पाठिशी तुम्ही उभे राहा अशा प्रकारचं आवाहन अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.